रविवार, १४ मे, २०१७

कवडसा

"कवडसा "
वैशाखातले उन्ह रणरण करत होते . यंदाचा उन्हाळा कडक आहे .असं काल गावात  कुणीतरी बोलत  होतं .ऊन असो नाहीतर थंडी जगावं तर लागणारच होतं.अजून केस चा निकाल बाकी होता.  मला कलंक घेऊन मरायचे नव्हतेच .मी ठरवलं होतं , एकदाचा  निकाल लागला कि मी जीव दयाला मोकळी .तेवढ्यात माझं लक्ष वाऱ्याबरोबर हलणाऱ्या  ,हिरव्या कंच मकाकडे गेलं.नुकतीच  मकाला कणसे यायला लागली होती .आता पाणी मिळाले नाही तर जळून जाईल .पावसाला यायला बराच अवधी बाकी  होता.
पाणी कुठून आणू.कोणाला पाणी मागू गावाने मला तसे वाळीतच टाकले होते .वरून पाटलानी .सक्त ताकीद दिली होती .गावात पाय ठेवायचा नाही .बराच वेळ विचार करून उत्तर सापडेना  डोके भनभन करू  लागले होते  .चहाची तल्लफ झाली होती ,चहा करावा  म्हणून खोपटा कडे वळले .आत्ता हेच माझं घर आणि संसार ,दोन चार फुटकी भांडी ,एक पत्र्याची पेटी ,दोन लुग्ड्याचे जोड आणि गुंठाभर जमिनीचा तुकडा , एकता जीव सदाशिव . खोपटाच्या बाहेरच तीन दगडाची चूल मांडली होती .चुलीत काटक्या टाकल्या .आग पेटायला आग पेटी खोलली.त्यातही दोनच काड्या शिल्लक होत्या .चूल तशी पेटलीच नसती म्हणून पालापाचोळा गोळा करून आणला चुलीत टाकला ,काडी लावली .धड धड करत चूल पेटली .पाण्याच आधन ठेवलं.बुक्नी आणि साखर आणायला गेले .तोवर वाऱ्याने आपले काम केलेच पेटलेला  पाचोळा उडत घेऊन .शेजारच्या माळरानात  घेऊन गेला ,माळरान पेटलं  .मला वाटलं ,वाऱ्याने विझून जाईल .तसं झालंच नाही .
  उभं माळरान पेटलं तेंव्हा आग इतकी भडकेन  असं वाटलं नव्हतं .आग  थोडी होती,तेव्हा तिलाच न्याहाळत  बसले.एका एका काडीला कशी पोटात घेते आणि उरते फक्त  राख .
राख ही बराचवेळ शिलगत ठेवते गवताच्या काडीला .माझं ही  असंच  होतं बऱ्याचदा एक अंधुकसा काजवा चमकतो आणि डोळ्यावर लख्ख प्रकाश टाकून पळून जातो .कितीतरी वेळ डोळे उघडे आहेत का मिटलेले,अंधार आहे उजेड  कळतच नाही ,   हळू हळू  शिलगत जातो उजेडं आणि दिसेनासा होतो .
 जसं जसं शिवार पेटलं .तसा जीव कासावीस झाला . मनात आगीचा डोंब उसळला .आग विझवू कशी .पाण्याचा पत्ता नाही .एकटी एवढी आग ?   आधीच काहीतरी करायला पाहिजे होतं .हतबल झाले .आग  विझवायला माझ्याकडे फक्त दोन हात होते .आग विझवणे म्हणजे स्वतः ला पोळून घेणे होते .मी नाही विझवली आग .बघत राहिले उघड्या डोळ्यांनी शिवार जळताना .तसे सगळं जळून गेल्यावर, जगणं  थोडीच थांबणार होतं..कुणी मेलं...अन कुणी जळाल तरी जगणे आहेच शिल्लक ....आणि सतत शिलगत  ठेवतात ..उरलेल्या खाणा खुणा .
मदतीला  हाक मारावी .तर पलीकडच्या शेतात दोन वडाच्या झाडाशिवाय कोणीच नाही .ती  साधी सुधी झाडे नव्हतीच .जणू वाड वडील होते त्या शेत मालकाचे .त्याला त्या झाडांशी बोलताना खुपदा पाहिलंय आणि मी माळरानात राह्यला आल्या पासून या दोन झाडाचीच तर सोबत होती .मी आणि ती दोघं.मी बघत बसायचे त्यांच्याकडे .जणू माझी दुः खे त्यांना कळत होती .  माझ्या निरपराध असण्याची ती साक्षी होती .४ वर्षापूर्वी शेतातून घरी परतत असताना .धो धो पाऊस आला विजा कडकडत होत्या .मी नवऱ्याला म्हंटले पाऊस थांबे पर्यंत झाडाखाली उभे राहू .तो म्हंटला झाडावर वीज कोसळत असती .तरी मी झाडाखाली थांबले .आणि माझी पोरगी आणि नवरा माळरानावर एकाच्या जुन्या पडक्या घराच्या आडोशाला थांबले .इथच नियतीने घात केला  आणि आळ माझ्यावर आला .डोक्यात दगड घालून मी माझ्या पोटच्या गोळ्याचा खून केला .गाववाल्यांनी पोलिसात तक्रार दिली   माझी जामीनवर  सुटका झाली होती .पण तारखांना हजर राहावे लागयाचे  .हि झाडं माझी एकमेव साक्षीदार .
  आणि झाडं थोडीच आग विझवतील .ते तर अजून पेटवतील आणि स्वतः ही जळून जातील.त्यांचा मालक शोधत बसेल बिचारा .जाऊ दे जळू दे जे जळायचे ते .मी मनाला समजवले .तुझे स्वतः चे असे होत काय तिथे . एक झोपडं  ,नकोसा झालेला संसार , चार लाकडं, थोडी मका  ,थोडी गवत काडी..पोतंभर  बाजरीची वाळलेली कणसे ,आणि काळी माती ,लाल माती ,आणि सगळीच नाती गोती .जळाले सर्वच .नाते म्हंटल्यावर  भानावर आले .कोणते नाते ? आगीचे आणि माझे? कि मातीचे आणि माझे? कि गावाचे नि माझे ?
तरी ही  डोळे पाणावले .मन अधीर झाले .घसा  कोरडा पडला .घशात ओतायला ही पाणी नाही .
तेवड्यात जोरात वावटळ आली .तशी आग वाढू लागली .आसपासच्या रानातल्या गवताशी पाठशिवणीचा खेळ खेळू  लागली .पलीकडच्या रानातली तीच दोन झाडे . वावटळी बरोबर जोरजोरात हलत होती ...जणू मला मुक्यानेच सांगत होती जा पळ इथून ही आग तुझ्यापर्यंत येईल ...वाचव तुझा  देह  ...पळ पळ ...मी तशीच बसून घट्ट जमिनीत नाळ बांधल्यासारखी .मायच ती माझी .तिला सोडून कशी जाऊ?   आत्ता गरम झळया लागू लागल्या होत्या .सुssसुssसुsसुsसू आवाज करत वारा त्याचे काम चोख बजावत होता. मी पुन्हा झाडांकडे बघितले .त्यांचा आक्रोश  चालूच होता .देह ,शरीर .....ते सारखे देह का म्हणत आहेत?  आत्मा ....मन का म्हणत नाहीत? ... असं प्रश्न पडला खरा पण त्याचं उत्तर ही माझ्याचकडे होतं. एकदा दुः खात होरपळलेले  मन पुन्हा पुन्हा कसे जळेन.राख कधी जळते का?
उठून उभी राहिले. आत्ता तिने संपूर्ण माळरान आपल्या मिठीत घेतले होतं .जिथवर नजर जाईल तिथवर आग होती .काय होऊन बसले .आधीच का नाही चिरडली तिला .कशी गिळायला येते मला...गीळ ...गीळ ..संपव ...सगळंच...
अगं अक्के..अक्का ....उठ ,पळ ,भाजशील...गवत वाळलेले आहे ..आग शिलगत चाललीय . कुठूनसा   आवाज आला . मागे वळून पाहले...हनुमंत  ...धावत होता...अक्के कसे  पेटले ग शिवार .... हा ...हनम्या .माझा मानलेला भाऊ ..किंवा मी त्याची मानलेली बहिण ...एकचं नातं...भाऊ बहिणीचं...नाहीतर बहिण भावाचं...काय फरक पडतो ..
       मी त्याच्याकडे बघितलं. कष्टाने रापलेल्या कपाळावर धावत पळत आल्यामुळे  घाम जमा झाला होता .घाम म्हणजे पाणी आणि रक्त , माझ्या डोळ्यात चमक आली . आशा पल्लवीत झाल्या .घामाने विझेल का आग? काहीतरी विचित्र विचार मनात डोकावला .तो मात्र " अक्के ..अक्के ..मला ....गदागदा हलवून विचारत होता ..आग कशी लागली? ..कशी लागली? ...सांग ना...   जे झाले ते झाले ..ही आग आपल्या आटोक्याच्या बाहेरची आहे .तू विचार कसला करतेय ,चल गावात ." मी म्हंटले ,"हनम्या जा तू मी नाही येणार "
मी नाही येणार म्हणजे?  तुला काय वेड लागलेय .हन्म्याने मला हाताला धरून रानातून बाहेर आणले .मी सोड सोड म्हणत असताना तो तसाच फरपटत नेत होता .
समोरून आत्ता अर्धा  गाव पळत येत होता ...क्षणभर घाबरले ..उलट्या दिशेने पळाले ...मनात शंकेची पाल चुकचुकली ..ही गावातली माणसे मला उचलून आगीत तर नाही  टाकणार? पण मी आगीकडे  पळतेय .मला भीती कशी नाही  वाटत  तिची .त्यापेक्षा गावातल्या माणसांची भीती  वाटत होती  . हनम्या माझ्या मागून धावत होता .ते पाहुन मी ही थांबले .तोपर्यंत सावित्रीकाकू माझ्यापर्यंत आल्याच .माझ्याकडे तिरका कटाक्ष टाकून हन्म्यला म्हणाल्या ...तुला म्हंटले नव्हते ...ही पांढऱ्या पायाची अवदसा अशी सगळ्या गावाला आग लावणार ...आधी  आई बाप ..लग्न झाल्यावर ..नवरा आणि मुलीला खाल्ले ...आत्ता गावावर नजर आहे .कशाला वाचवतो तिला .ही मेलेलीच बरी .सावित्री काकू चे बोलणे आगीपेक्षा जास्त पोळत होते . माझे म्हणावे असे या गावात हनम्या सोडून कोणीच नव्हते .जे होते ते देवाघरी होते. आणि त्यांच्या देवाघरी जाण्याला गाव मला जबाबदार धरत होते हन्म्याने काकूला गप्प राहायची खूण केली .तरी ती तोंड सुख घेत होती .मी गप्पच ....चार दोन माणसे बोलली ...जे जळायचे ते जळू द्यावा ..आता ही आग कोण नाही विझवू शकत
अरे देवा .. ...माझं शेत पण जळाले ...आणि झाडं ..पाऊणशे वर्षापूर्वीची झाडं ..पण  आत्ता जाळली या बयेने ...त्या झाडांचा मालक माझ्यावर दात ओठ खात होता ...डोक्याच्यावर ज्वाळा उसळत असल्यामुळे पलीकडचे शेत दिसत नव्हते .जास्त आग भडकत चाललेली पाहून ..बरीचशी मंडळी मागे फिरली ......अचानक  जोरात वारा सुटला ...भर दुपारी सूर्य ढगाआड गेला .....काळे काळे ढग आकाशात सैरावैरा पळू लागले ...मी आकाशाकडे बघितले ....आत्ता कुठल्याही क्षणी चार दोन थेंब पडतील असे वाटू लागले होते ...मला एक कवडसा सापडला ...माझे डोळे आभाळावर खिळले होते ...आग माझ्याकडे धाव घेत होती ...पाऊस कि आग ..यात मी उभी होते ...जे मिळेल ते आत्ता  मनाची तयारी झाली होती ...हनम्या अजून तिथेच उभा होता ...जा हनम्या जा ...माझी शप्पथ आहे तुला ...मी येते ...तुझ्यामागे ..त्याने तिथून जावे म्हणून मी खोटे बोलत होते ...हन्म्याने माझी  आशा सोडली ....खिन्न मनाने चालू लागला .....तेवढ्यात  तो ओरडला अक्के पाऊस आला  ग ...हे बघ माझ्या कपाळावर  एक थेंब पडला .....मी लगेच म्हंटले विझवून टाक...ही आग तुझ्या घामाने ...तुझ्या घामानेच  विझेल.....तेवढ्यात माझ्या पदराने पेट घेतला ...हनम्या ओरडत होता अक्के पदर पेट्ला...मी तशीच उभी ...हन्म्या ओंजळीने  माती उचलून पेटत्या पदरावर टाकत होता...मी चमकून त्याच्याकडे पहिला ..मातीनं आग विझली असती ..तर पाण्याची काय गरज होती ...त्याच्या पोरखेळ ...बघत  ..मी आभाळाकडे हात पसरवून उभी होते ...डोळे मिटवून पावसाला जणू आवाहन करत होते ... ..पाऊस मात्र थेंबाचा खेळ खेळत होता ..एक थेंब हातावर ... एक थेंब डोळ्यावर ...एक थेंब गालावर ..एक थेंब ओठावर ....एका थेंबाने माझा गळा ओला होणार नव्हता...पण आशेचा किरण दिसला होता ....अजूनही पदर पेटतच  होता ...आत्ता मी पदर एका  हातात धरला ....दुसऱ्या हाताने विझवत होते ..अगदी शांत पणे..हात पोळत होते ..पण मला वेदना होत नव्हती ...एव्हाना पावसाने कोसळायला सुरवात केली होती  .....मी हाताकडे बघितले शेवटी ते पोळून काळे झालेच होते .....ते आधीच झाले असते  तर ...पण मला  जगण्याचा कवडसा नसता भेटला ....आग शांत झाल्यावर ...पलीकडल्या शेतातल्या झाडाची आठवण झाली ...ती दोन झाडे ...तशीच उभी होती ...आनंदात पानें हलवत होती ..जणू मला वाचवले यासाठी ...कि देह वाचवला यासाठी .....नाही... देहासोबत मनही आज वाचले होते ....तेच .....मला आत्ता  कळले होते ..निकाल काही लागू देत   ..आत्ता  मी जगणार होते ....देव जगवेल तेवढं.

लेखिका --मनिषा बांगर -बेळगे ,
  दुबई 

गुलमोहर : कडा

गुलमोहर : कडा: या मुक्तछंद कवितेची पार्श्वभूमी --एका सैनिकाच्या प्रेमिकेची मनोव्यथा आहे , सैन्यात मोहिमेवर असताना बेपत्ता झालेल्या प्रियकराची ती आतुरतेन...

गुलमोहर : ध्येय ~~~~~~~~काळ आला  वेळ गेली परत फिरा सावल्यान...

गुलमोहर :
ध्येय ~~~~~~~~काळ आला  वेळ गेली परत फिरा सावल्यान...
: ध्येय  ~~~~~~~~ काळ आला   वेळ गेली  परत फिरा  सावल्यानो   विरह फुलांचा  ह्रदयास  पीळ घाली ऋण घ्यावे  ऋण द्यावे  विसर...

गुलमोहर : पहिल्यांदाच मला बुद्धी प्रामाण्य पत्र हाताशी लागले...

गुलमोहर : पहिल्यांदाच मला बुद्धी प्रामाण्य पत्र हाताशी लागले...: पहिल्यांदाच मला बुद्धी प्रामाण्य पत्र हाताशी लागले आहे … मनीषा तुझे खूप आभार.हल्ली असे कुणी लिहित नाही - लोकांना आवडेल का? रुचेल का? असे ल...

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३

पहिल्यांदाच मला बुद्धी प्रामाण्य पत्र हाताशी लागले आहे … मनीषा तुझे खूप आभार.हल्ली असे कुणी लिहित नाही - लोकांना आवडेल का? रुचेल का? असे लोकानुनय करणारे प्रश्न मनात उभे राहतात. मळलेली पायवाट सोडून नवीन पायवाट रुजवायचा हा प्रयत्न … खूप वाचा

नमस्ते ,सदरील लिखाण माझ्या मनावरील कोरीव शिल्प आहे .सत्य् घटनेवर आधारित आहे.

प्रिय ,

सदसदविवेकबुद्धी
खूप दिवसाचे तुझ्याविषयी लिहीन म्हणतेय ,सारखे आज उद्या करत होते. आजकाल तू कुठे दिसत नाही .
या भूतलावरून अगदीच गायब होण्या आधी तुझ्याविषयी दोन शब्द लिहीन म्हणतेय तुझी ओळख झाली तेंव्हा मी साधारण १० वर्षाची होते.इयत्ता ४ थी त शिकत असेन ,बालभारती मध्ये एक धडा होता "सद्सद्विवेकबुद्धी" या धड्याचा लेखक मात्र आठवत नाही. हा शब्द पहिल्यांदा उच्चारला आणि खूपच आवडून गेला.१० वेळा न बघता लिहून काढला. भारीच वाटला . त्याचा अर्थ धड्याच्या खाली शब्दार्थ मध्ये दिला होता खरा
पण मला काही रुचला नाही .किंवा समजला नाही. म्हंटले अजून एखाद्या मास्तराना विचारावे. साधारण हि सद्सद्विवेकबुद्धी कशाशी खातात.त्यांनी हि थातूर मातुर सांगून बोळवण केली.
आईने म्हंटले मोठी झालीस कि समजेल. वडिलांनी हि त्यांच्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
वडिलांनी थेट महाभारतातील उदाहरण दिले " अश्व्थाम्याच्या मृत्युच्या बातमीने द्रोणाचार्य साशंक झाले खरे ,पण सत्यवचनी युधिष्ठर ने अश्वत्थामा (हत्ती )मेला अशी ग्वाही दिल्यानंतर त्यांची सद्सद्विवेकबुद्धी सुप्त झाली , आणि ते पुत्र वियोगात शोकाकुल झाले.
त्यावेळी महाभारत समजण्याइतपत वय नव्हते .कृष्ण एकमेव पात्र माहित होते .
एका मैत्रिणीने ती अक्कलदाढ असावी असे सुचवले .पण मनाने ठाव घेतला तू काहीतरी खूपच अप्रतिम गोष्ट आहेस. आपल्याला जर मिळालीस तर काय होईल.
काहीही करून मिळवायचीच ,विचाराने कित्येक दिवस स्वस्थ बसू दिले नाही.
एकदिवस धीर करून वडिलांना म्हंटले ,मला आणि माझ्या भावाला खाजगी शिकवणी ची गरज आहे.
अजून कुणी जाणकार भेटेल हि माफक अपेक्षा ठेवून ठरल्याप्रमाणे एका मास्तरांकडे आम्ही शिकण्यास जाउ लागलो.
गणित,विज्ञान यातील जरा बरेचसे ज्ञान बघून मास्तर बोलले, तुला कोणता विषय अवघड जात आहे . आपण फक्त तोच घेत जाऊ ,मी तत्काळ "मराठी" असे उत्तर दिले. मला तर आयतीच संधीच मिळाली होती.तुझ्याविषयीची जिज्ञासा अस्वस्थ करत होती.
कधी एकदा विचारीन असे झाले होते. शेवटी एक दिवस मास्तरांवर प्रश्नाची सरबत्ती सुरु केली . … ती अशी …
१ )सद्सद्विवेकबुद्धी वयाच्या कितव्या वर्षी येते ?
२)अक्कलदाढेला पर्याय असते कि अक्कलदाढ येणे म्हणजेच सद्सद्विवेकबुद्धी येणे ?३ ) तिचा कुठे कुठे उपयोग होतो. ? ४ ) ती लवकर येण्यास काही उपाय आहेत का ? ५ ) ती जर आपल्यात नसेल तर काय होऊ शकते ? माझ्या बाळबोध(खत्रूड ) प्रश्नांनी मास्तर चक्रावले . उद्या सांगतो म्हणून पाठवणी केली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच वारीकाकरवी सांगावा धाढला.तुमच्या कन्येला खाजगी शिकवणीची मुळीच गरज नाही.ती जात्याच हुशार आहे. मात्र तिच्या छोट्या भावाला नियमित पाठवा.
झाले... घोडे गंगेत न्हाले काय आणि कोरडेच राहिले काय सारखेच … सगळे प्रश्न अनुत्तरीत राहिले… . कालंतराने मी विसरून गेली.
स्वतःचे विचार आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत होण्यास बराच काळ जावा लागला . पुढे पदवीचे शिक्षण घेत असताना ,तुझी पुन्हा आठवण झाली खरी … पण माझ्या प्रश्नाची उत्तरे काळाने मला आपोआप दिली होती.
सद्सद्विवेकबुद्धी म्हणजे कुठल्याही गोष्टीविषयी ती योग्य आहे कि अयोग्य याची असलेली जाणीव. तू शाबूत असलीस कि मनुष्य पापकर्म करत नाही .
स्वच्छेने कर्म करण्याचा अधिकार फक्त विवेकी मनुष्यास आहे ,कारण त्याच्याठायी conscious mind (सद्सद्विवेकबुद्धी) आहे.
आजच्या परिस्थितीत तुझा अभाव प्रत्येक ठिकाणी जाणवतो. ... तुझ्यात बरीचशी गुपिते सामावलेली आहेत.ती मी कायम नोट करून ठेवलीत. हाच माझा अमुल्य ठेवा आहे.
प्राचीन काळापासून सशक्त व्यक्तित्व (शील) याला अतिशय महत्वाचे मानले गेले आहे. माणसाकडे षट संपत्ती असायला पाहिजे :
साम ( मनाचा शांतपणा आणि गंभीरपणा)
दाम (स्वयंवर नियंत्रण आणि स्वतःच्या वासनांवर नियंत्रण)
उपरती (तृप्तता)
तितिक्षा (सहनशक्ती)
श्रद्धा (विश्वास)
समाधान (संयमशीलता किंवा केंद्रित मन)
हे सहा गुण असल्याशिवाय, मनुष्य मुमुक्षु (ज्याला मोक्ष किंवा मुक्ती पाहिजे) बनू शकत नाही. आणि जोपर्यंत मनुष्य मुमुक्षु बनत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान प्रदान केल्या जात नाही.
म्हणूनच माणसाकडे विवेक (चांगल्या आणि वाईट यामधील फरक कळण्याची समज), वैराग्य(उदासीनता), आणि षट संपत्ती हे असतील तर तो मुमुक्षु बनतो. म्हणूनच भगवान बुद्ध म्हणाले की शील,समाधान ,संयमशीलता आणि प्रज्ञा (दैवी ज्ञान) हे मनुष्यामध्ये उपस्थित असले पाहिजे.
मनुष्य मध्ये अहिंसा,शील गुण असले पाहिजे. त्याला समाधी, ध्यान अवस्थेचा(meditation) अनुभव असायला हवा. तेव्हाच तो प्रज्ञावान म्हणजेच ज्ञान आणि सद्सद्विवेकबुद्धी या ईश्वरीय देणग्या असलेला मनुष्य बनू शकतो.
मनाची स्पष्टता नसणे आणि तणाव यामुळे अधर्म होतो . जेव्हा मन केंद्रित नसते आणि हृदयात सल असते तेव्हा अधर्म होतो.म्हणून ज्ञान आणि सद्बुद्धी हे तुम्हाला धर्माच्या मार्गाला घेऊन जातात .
तू आत्मा आणि भौतिक शरीर यांचा समन्वय साधतेस , त्यामुळेच भगवद्गीतेत म्हटले आहे ,
| नास्ती बुद्धीरयुक्तस्य नचायुक्तस्य भावना |,
| नचाभावयत: शांती: अशांतस्य कुत: सुखम् |

"जर तुमचे स्वत:चे चित्त तुमच्या आत्म्याशी स्थिर झालेले नसेल तर ना तुमच्या बुद्धीला धार येईल नां तुम्हाला भावनिक स्थैर्य आणि स्पष्टता येईल."


संपूर्णम
पुन्हा तुला लिहीनच
प्रिय भारतीय न्यायदेवता ,

तू लोकशाहीचा एक स्तंभ आहेस ,तुझ्या शिवाय लोकशाही अपूर्ण आहे. डोळ्यावर पट्टी बांधून पुरावे ,साक्षी याचा पडताळणी करूनच तू निर्णय देतेस सदरील निर्णय अनेकदा पटणारे नसतात. तरीही आम्ही तुझ्या सर्व महत्वपूर्ण निर्णयांचे स्वागत करत असतो. कारण १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील एक निरपराधाला शिक्षा नको. याची तू काळजी घेत असतेस .

अशातच आलेल्या एका निर्णयाचे स्वागत .... लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये फेरफार करण्याची मागणी निवडणूक आयोगाने अनेकदा केली होती. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी या बदलांना विरोध केला होता. लिली थॉमस आणि लोक प्रहरी या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या अर्जावर गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.हा निर्णय सदोष असला तरी स्वागतार्ह आहे. भारतीय लोकशाही मध्ये असा महत्त्वपूर्ण निर्णय काही प्रमाणत का होत नाही देशातील गुनेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधी साठी चपराक आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही चांगल्या लोप्रतीनिधीवर अन्याय होऊ शकतो,त्यासाठी असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तातडीने निकाली काढावे. याशिवाय आणखी एक निर्णय उत्तरप्रदेशमधील उच्च न्यायालयाने दिला जातीय मेळाव्यांवर बंदी घालण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत आहे.मध्यंतरी उत्तरप्रदेश च्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी " ब्राम्हण भाईचारा" या संमेलनाची सुरवात केली होती.या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमधील वकील मोतीलाल यादव यांनी थेट उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.त्यात यश मिळाले . इतर राज्यांनी हि यावरून धडा घ्यावा घाणरडे जातीय राजकारण बंद करावे. एकतर भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असताना तुम्ही निवडणुकाही जातीवर आधारित घेणार आहात?

तुला दोन शब्द लिहिण्याचा हेतू हाच कि आणखी असे बरेचसे निर्णय येऊ देत.मनापसून स्वागत होईल.

पुन्हा लिहीनच ….

एक अनिवासी भारतीय नागरिक
प्रिय भारतीय न्यायदेवता ,

तू लोकशाहीचा एक स्तंभ आहेस ,तुझ्या शिवाय लोकशाही अपूर्ण आहे. डोळ्यावर पट्टी बांधून पुरावे ,साक्षी याचा पडताळणी करूनच तू निर्णय देतेस सदरील निर्णय अनेकदा पटणारे नसतात. तरीही आम्ही तुझ्या सर्व महत्वपूर्ण निर्णयांचे स्वागत करत असतो. कारण १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील एक निरपराधाला शिक्षा नको. याची तू काळजी घेत असतेस .

अशातच आलेल्या एका निर्णयाचे स्वागत .... लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये फेरफार करण्याची मागणी निवडणूक आयोगाने अनेकदा केली होती. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी या बदलांना विरोध केला होता. लिली थॉमस आणि लोक प्रहरी या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या अर्जावर गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.हा निर्णय सदोष असला तरी स्वागतार्ह आहे. भारतीय लोकशाही मध्ये असा महत्त्वपूर्ण निर्णय काही प्रमाणत का होत नाही देशातील गुनेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधी साठी चपराक आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही चांगल्या लोप्रतीनिधीवर अन्याय होऊ शकतो,त्यासाठी असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तातडीने निकाली काढावे. याशिवाय आणखी एक निर्णय उत्तरप्रदेशमधील उच्च न्यायालयाने दिला जातीय मेळाव्यांवर बंदी घालण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत आहे.मध्यंतरी उत्तरप्रदेश च्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी " ब्राम्हण भाईचारा" या संमेलनाची सुरवात केली होती.या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमधील वकील मोतीलाल यादव यांनी थेट उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.त्यात यश मिळाले . इतर राज्यांनी हि यावरून धडा घ्यावा घाणरडे जातीय राजकारण बंद करावे. एकतर भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असताना तुम्ही निवडणुकाही जातीवर आधारित घेणार आहात?

तुला दोन शब्द लिहिण्याचा हेतू हाच कि आणखी असे बरेचसे निर्णय येऊ देत.मनापसून स्वागत होईल.

पुन्हा लिहीनच ….

एक अनिवासी भारतीय नागरिक