शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२


कविता -आर्जव 
असंख्य आर्जवा नि  नभास  भेदले असावे 
 आर्त  साद घालशील  मनी ताडले  असावे  

विरह  नित्याचीच   गाथा  ,भेट  परिपाठ घेते
तु दुरस्थ बरी   , जणू  भाळी गोंदले  असावे 

 जरी  मुठीत  बंदिस्त  केले जीर्ण  कल्पित  
 एकाकीपणा  बहाल करीत   निसटले  असावे 

गायले  भुपाळी  दशदिशा पादाक्रांत केल्या 
तूर्तास  बसली  वाचा  , गुपित जाणले  असावे
 
वादळाशी ग  सख्य माझे   ,गर्वाने  उडाले   
क्रूर चेष्टेत  त्याने पंखच   छाटले असावे 
                      
                        मनिषा बांगर -बेळगे 


 माझा पहिला अभंग-

|| लाभले संस्कार | आई बाप थोर ||
|| अज्ञानी मी पोर  |गुरु विना ||

||जमा केली माया | जन्म गेला वाया 
||उद्धार कराया| गुरु माझा ||


||येई डोळा पाणी | स्मरे गुरु  वाणी ||
||यावे आठवांनी  | गुरु राज ||

  ||तैरे अधांतरी|मी  भवसागरी||
||न्यावे   पैलतीरी | गुरु स्वामी  ||

||कठोरता बरी  | भेद नसे परी ||
||निर्मळ अंतरी | गुरुवर्य||

||नमन करिते  | चरण पूजिते  ||
||गुरूस  स्मरते  | पौर्णिमेशी  ||

---मनिषा बांगर -बेळगे 



ध्येय 
~~~~~~~~
काळ आला 
 वेळ गेली 
परत फिरा 
सावल्यानो  
विरह फुलांचा 
ह्रदयास 
पीळ घाली

ऋण घ्यावे 
ऋण द्यावे 
विसरू नका 
भावनानो 
कधीच उपकार
जरी नाती 
जून झाली  

शब्द दिले 
शब्द घेतले 
आठवू नका 
वेदनानो
त्याच  जखमा 
जरी खपली 
निघाली 

वारे सुटले 
रान पेटले 
पळवू  नका 
वादळानो 
असंख्य गुपिते 
धरत्रीच्या 
गर्भातली 

प्रकाश आला 
अंधार गेला 
भिवू नका 
दिव्यानो 
 जपा वात 
 बघा आताच     
 रात्र झाली

उणीव उरली 
जाणीव झाली   
थकू नका 
पावलानो
ध्येय गाठा
जरी दिशा 
बदलली  
~~~~~~~~~
मनिषा बांगर -बेळगे 
       दुबई 




भास 
~~~~~~~~~~~~
रानात शीळ  आली
कानात शीळ आली 
मनात शीळ आली 
ध्यानात शीळ आली 
हळूहळू श्वास माझा
 मलाच  शीळ घाली 

अंगणात भास झाला 
घराचा तो खास झाला 
वेदनांचा ऱ्हास झाला
उष्ण  श्वास झाला  
हळूहळू भास त्याचा 
 माझाच दास झाला 
~~~~~~~~~~~~~~~~
 --मनिषा बांगर -बेळगे ,१/ ९ /१२ 
       दुबई 

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

सोपानदादा


 ---------रम्या कचऱ्याच्या गाडीची वाट बघत होता .चार दिवसापासून समता नगर मध्ये कचरा गाडी आलीच नव्हती .रम्या ८ वर्षाचा चुणचुणीत मुलगा  त्याचे आईवडील या जगात नव्हते .२ वर्षापूर्वी फुटपाथवर झोपलेले असताना अंगावर गाडी गेल्याने जागीच चेंदामेंदा झाले होते .त्या अपघातात तो कसा वाचला त्यालाच आठवत नव्हते . रम्या चार दिवसापासून उपाशीच होता. कचऱ्याच्या गाडीवरील ड्रायव्हर सोपानदादा रोज रम्यासाठी भाकरी घेऊन येत असे . कधी दादाची ड्यूटी बदलली तरी गाडी तीच होती गाडीसोबत भाकरी येत असे. भुकेने व्याकूळ झालेल्या रम्याने समोरच्या टपरीवाल्याकडे चहा आणि बिस्कीट मागितले ,बदल्यात भांडे धुवून देतो कबूल केले.पण टपरीवाल्याने त्याला हाकलून लावले .बेवारस कुत्रे रम्याच्या पायात घुटमळत  होते.कुत्र्याची आणि रम्याची अवस्था सारखीच होती म्हणून बहुदा त्या दोघांमध्ये गाढ मैत्री होती.२ वर्षापासून रम्या आणि कुत्रा एकमेकांची सोबत करत होते .रम्याच्या पायाला पोलिओ झाल्यामुळे त्याला कोणी काम देत नसे.  सोपानदादा या आठवड्यात काम मिळवून देणार होता.आत्ता काम हि नाही आणि भाकरी नाही.खूप ठिकाणी भटकून पदरी निराशाच आली.रात्र बरीच झाली होती.कुत्रं अजूनही रम्यासोबतच होतं. या दोघांमध्ये मूक संवाद चालत असे दोघांनाही एकमेकांची मने कळत होती रम्या  झोपडीकडे चालला होता  म्हणून कुत्रं  जोरजोरात विव्हळत होतं. रम्याने त्याला पायाने दूर झिडकारले ....आणि म्हंटला  ..खां..खा मला ..खातूस का? आरं तू काही खाऊन पोट भरशील ...ते म्या नाही खाऊ शकत. अचानक ओरडल्याने कुत्र केकटत पळाले.रम्या जवळच्या एका बस थांब्याच्या आत जाऊन पाय पोटात घेऊन मुटकुळं करून बसला.वर्षभरापूर्वी याचं ठिकाणी आपण भिक मागत असू ...याची त्याला आठवण झाली .दिवसभर भिक मागून बऱ्यापैकी पैसे मिळत होते.त्याच पैशाचं खायला आणून कुत्रं आणि तो आनंदात  जगत होते. पण एक दिवस सोपानदादा आला अन सगळच बदललं.एक कचऱ्याच्या गाडी वरच्या ड्रायव्हरने ,रम्याला माया ,ममता दिली.आपले माणूस काय असते ह्याची जाणीव त्या कोवळ्या मनाला झाली होती.त्याच्या दादावर अतोनात जीव जडला होता. भिक मागायची नाही आणि चोरी करायची नाही या दोन गोष्टी रम्याने चांगल्या आत्मसात केल्या होत्या .जो पर्यंत काम मिळत नाही त्याच्यासाठी भाकरी देण्याची हमी दादाने घेतली होती .तेंव्हापासून आत्तापर्यंत नित्यनेमाने आपणास भाकरी मिळत असे.आज चार दिवस झाले दादा इकडे फिरकले नाहीत.रम्याला आता सगळं असह्य झाले होते. तेवढ्यात कुणीतरी सदरा खेचत होतं.रम्याने मागे वळून पहिले .त्याचा दोस्त कुत्रा त्याला बस थांब्याच्या बाहेर खेचत होतं .रम्या बाहेर आला ,तर त्याला एक म्हातारी तिथं उभी दिसली,तिच्या हातात एक गाठोड होतं.तिने रम्या तूच का म्हणून विचारले रम्याने होकारार्थी मान हलवली."आरं पोरा म्या तुझ्या दादाची आई हाये ... हे कुत्रं तुझं हायी का ?म्या मागच्या गल्लीत आवाज देत व्हती तेच इथं मला घेऊन आलं"."लई हुशार हायी.मी चार दिसापासून तुला भाकरी द्यायला रोज येती ,पर तू गावला नाहीस ..आज गावलास..आत्ता म्याच भाकरी घेऊन यैल..."पर दादा कुटं हायती" ..इति रम्या म्ह्तारीने खोल श्वास घेतला ,गाठोडं रम्याच्या हातात देत बोलली ,"बदली झाली नव्हं का ?रम्याला भाकरी पेक्षा दादाची उत्कंठा लागली होती.बदली म्हणजी काय ?रम्याला म्हातारी काही लपवतेय असे वाटले .म्हातारीने समजावले दादा दुसऱ्या शहरात गेला. कधी येणार हा प्रश्न आलाच.म्हातारीने त्याला आधी भाकरी खाण्यास सांगितले .तसा रम्याने गाठोडं उघडून..आधी कुत्र्या पुढे तुकडा टाकला.म्हातारी या दोन जिवाकडे  बघत बसली .{चार दिवसापूर्वी पेपरात बातमी होती ,कचऱ्याच्या गाडीला भीषण अपघात ,ड्रायव्हर जागीचं ठार ......}  ------मनिषा बेळगे     
   दुबई                 

कडा

या मुक्तछंद कवितेची पार्श्वभूमी --एका सैनिकाच्या प्रेमिकेची मनोव्यथा आहे , सैन्यात मोहिमेवर असताना बेपत्ता झालेल्या प्रियकराची ती आतुरतेने वाट पाहतेय . 
--------------- 
कडा 
--------------
पावसाची रिमझिम सुरु होती ,थंडगार वारा अंगाला झों
बत होता
धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते ....
चालत चालत वाड्यातून कड्यावर कशी आले कळलेच नाही
कड्या जवळचा पार तुला फार आवडतो ना
उंचावरून गाव किती सुंदर ,मोहक वाटते ना
चहू बाजूनी तपकिरी रंगाची कौलारू घरं
कौलारूला खट्याळ स्पर्श करणारी उंबराची झाडं
कच्ची ,पिकलेली उंबरं... झाड हळूच कौलारावर सोडतं
आणि तीच उंबरं घरंगळत पुन्हा झाडाच्या पायाशी येतात
हा मनोहर खेळ पाहण्यात तू तासनतास कड्यावर बसून रहायचास
वरती निळे निळे आभाळ...निळाई चे प्रतिबिंब कड्या लगत असलेल्या समुद्रात पडायचे .
समुद्र आणि आभाळ एकमेकात मिसळून जातात
समुद्र पासून गावाचे रक्षण करणाऱ्या या कड्याचा तुला फार गर्व वाटायचा
..असचं दुसऱ्यासाठी जगावे .....पुढच्या जन्मी मी कडा व्हावे
तुझ्या या बोलण्याचे मला हसायला यायचे ..डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायचे
तुझ्यासारखा सैन्यात असणारा जवान इतका हळवा असू शकतो ....
हिरवाईने नटलेला हा कडा ,तुझ्या माझ्या प्रीतीचे प्रतिक वाटतो मला
पण तुझ्या जाण्याने इथले सौंदर्य जराही कमी झालेले नाही
अजून तसेच दिसते गाव ,पण तू मात्र बदललास
... मात्र इथे उदासीनता असते ,पण ती हि माझ्यापुरतीच
कधी कधी मी एकटीच येते इथे
कड्यावर चढून आले कि मी एकटी नसते
तुझ्या आठवणी करतात ना .... माझी सोबत
कड्यावर दाट धुके पसरायचे तेंव्हा आपण धुक्यात लपंडाव खेळायचो
आताही धुके पसरले कि मी अंगठा तुटलेल्या चपला घालून तुला शोधायला बाहेर पडते
येशील का रे परत नवीन चपला घेऊन ...ना नको चप्पल ....तू असाच ये...
येशील ना .....वाट पहातेय
परवा तुझी म्हातारी आई आली होती ...मला कुशीत घेऊन खूप रडली ......
मी हि माझ्या भावनांना वाट करून दिली ...दोघी बराच वेळ निशब्द बसून होतो ..
म्हातारी खंगलेली वाटली ,गाल खोबणीत बसले ...तोंडात दात राहिले नाहीत ...डोळे खोल गेलेत ...पण चमक कायम आहे
तुझ्या आईच्या आणि तुझ्या डोळ्यात मला फरक वाटतच नाही ..
या वेळेस तुझी आई लग्न कर नाही म्हणाली ..जीव भांड्यात पडला ....काय घ्या तुझी शप्पथ घातली असती तर ..
पण थोडे पैसे देवून गेली ...मी हि हक्काने घेतले ...हा महिना खाण्याचा प्रश्न मिटला ..तोपर्यत तू येशीलच
पण आजकाल माझ्या विश्वासाला चरे पडू लागलेत ....काल कड्यावरून दरड कोसळली म्हणे ...
सगळा कडा कोसळला तर ,अख्खा गाव जाईल त्याखाली ...नाही नाही असे होणार ..मला विश्वास आहे ...तू येशील ..
पुन्हा कड्यावर जाऊ धुक्यात लपंडाव खेळू .....
येशील ना....... वाट पाहतेय
-------------------------------मनिषा बेळगे

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

कविता फुलते



कविता फुलते  ,कधी तनामनातून  
कैद करते ,   धुंदी   त्या क्षणातली

कविता भिरभिरते  कधी रानावनातून 
खोपा करते , उरते  माय पिलातली

कविता बागडते  ,कधी  पानाफुलातून 
मध चाखते  , भासे  राणी  फुलातली

 कविता स्फुरते ,कधी धरीत्रीच्या  कणाकणातून 
आभाळ भेदते ,जणू बिजली पावसातली  
 
कविता वाहते   , उंच उंच डोंगरातून 
वेगे  कोसळते ,रुणझुण  धबधब्यातली 

कविता जगते , कधी रोमारोमातून
विरहते,जणू आठवण मर्मबंधातली 

कविता मुरते  , कधी  सर्वांगातून 
  रचते ,  गीते ओठातली   

मनिषा बांगर -बेळगे 

उंबरा


 
दिवाळी  दसऱ्यास तोरणे लावली 
सडा रांगोळीने शोभा आणली 
हर्ष त्यास  लक्ष्मीच्या पावलांचा 
 मिरवतो दिमाखात उंबरा घराचा 

परंपरेने लेकीस पाठवले  सासरी 
 सून हि आली  माप ओलांडून  दारी
झेलून भार अंगावर नातवंडांचा 
 मिरवतो दिमाखात उंबरा घराचा 

करी मज्जाव विकण्या जीव असे धन्यात 
तुझा मी मूक सवंगडी देईन  आजन्म साथ 
थबकती पाऊले करी स्वीकार दर्शनाचा 
मिरवतो दिमाखात  उंबरा  घराचा

कटकारस्थाने चाटून गेली
पिढी दरपिढी भांडून गेली 
पचवला प्याला विषाचा 
मिरवतो दिमाखात  उंबरा  घराचा

अगणित पिढ्यांचा  चालवी वारसा  
जन्म मृत्यू ने झिजला जरासा 
मज दिसे त्यात अंदाज वीराचा  
मिरवतो दिमाखात  उंबरा  घराचा
         ------मनिषा बांगर -बेळगे 

प्रीत


 माझे शब्द  दाटले धुक्या परी
 का तुझे  भाव  गोठले अंतरी?   
 
माझे ओठ  मिटले मुक्या परी
का तुझे हास्य    रुठ्ले  अंतरी?  
    

माझे मन  फिरले पक्षा परी 
का तुझे पंख  मिटले  अंतरी ?

माझे तन  बहरले श्रावणा परी 
का तुझा  पाऊस बरसला अंतरी?

माझे ऋण  उरले तरू परी
का तुझा  रोम लोपला अंतरी ?  
 
मी प्रीत   केली  मीरे परी
का  तूझ्या  नसे  कान्हा अंतरी?
-----मनिषा बांगर-बेळगे 

गझल -- रमले मी न जरा ही

गझल -- रमले मी न जरा ही 

मौनात भेटला स्वानंद, शिणले मी न जरा ही 
भावूक भावना स्फुरल्या , उरले मी न जरा ही 

देहात गोठली वल्गना , फसला डाव पुरेसा 
सांदून वेदना घेतल्या, झुरले मी न जरा ही

गाऊन मी जराशी नित्य भजने आठवणीची
चालून गाठला हा रस्ता, खचले मी न जरा ही

फाडून टाकली पुस्तके , लिहिलेली गत काळी
लाभून आजही लेखण्या , रमले मी न जरा ही

मागून घेतले जिंकण्या ,उसने तंत्र भलेही
पेटून ऊठता , भांडण्या भुलले मी न जरा ही

शोधीत राहिले शब्दांना ,दिसले ना मज पुन्हा
ओठातली कहाणी अंती ,वदले मी न जरा ही

होऊन बंदिनी आपल्याच घराला शिणलेली
थाटात नांदताना ,दोषी जगले मी न जरा ही

नाही कमी सुखाची ,आनंदात निषे ला बघ वेड्या
प्राणास सोडताना , डोळे मिटले मी न जरा ही


------------मनिषा बेळगे

रिते


------------------------------------------------
फुलांच्या सुगंधात शोधून पहा मला रे 
मधाने जपला माझ्यातला गोडवा खुला रे 

शोधून पहा फुलराणीच्या जुन्या खाणा खुणा रे
पाकळ्यात लपलास का माझ्या मना रे

कसा विसरशील बेधुंद सुगंध माझा सख्या रे
मिठी कशी सोडशील भावना बोलल्या मुक्या रे

शब्दात शोधले सुख मी ,किती जखमा ओथंबल्या रे
वेच्लेस मोती अलगद ,रित्याच शंख शिंपल्या जपल्या रे

भावनेत गुंतला एक शापित काजवा नवा रे
वेदनेत आर्तता भरून उडाला पुन्हा एक थवा रे

गात्रे ओली माझी , खुला आसमंत भिजला पहा रे
अंधुकसा प्रकाश दे मज मावळल्या दिशा दहा रे

मिटली पापणी ,भुललास नयनातली नशा रे
वेचली तू सुखे ,उरलेल्या फुलांना आत्ता तुझीच आशा रे

प्राजक्ताने सांडताना पुन्हा तुझं मारल्या किती हाका रे
रिते पात्रहाती घेऊन नागमोडा घाट पार केलास फुका रे

--------------------------मनिषा बांगर -बेळगे

हे जीवना


-----------------
सांगा कुणाचे काय गेले ,जगता आले तसे जगवीत गेले 
जगताना सहाण झाले ,पुनपुन्हा देहात चंदन उगवीत गेले 
स्वयं प्रकाशित कशी झाले , सोबतीला चंद्रास जागवित गेले 
जन्मास एकटीच आले , सावलीस माझ्या लपवित गेले
अर्थासी संदर्भ मिळाले ,अव्यक्त होऊन जगास शिकवीत गेले
कुणी बापुडे खिन्न झाले ,कारण आरोप सदाच चुकवीत गेले
पेटून मशाल आग प्याले ,दाहकता अंगी साठवीत गेले
गाव माझे उपरे झाले ,घटका दोन घटका आठवीत गेले
मनात कल्लोळ माजले, ,झोक्यागत मनास झुलवीत गेले
प्रकाशासाठी प्रार्थना झाले ,ओंजळीने सूर्यास झाकवीत गेले
उमाळे कंठात दाटले ,जमेल तसे जगाला रडवित गेले
निळे समुद्र हिरवे झाले ,कुंचल्याने निसर्गास रंगवीत गेले
जरी डोळ्यात अश्रू जमले ,तरी जीवना तुला मी नेहमीच हसवीत गेले
--- मनिषा

हाहाकार


जीवनाचा संघर्ष आता फार झाला
पुन्हा तोच घाव ह्रदयात पार झाला

फुलताना कळीला काट्याचा भार झाला
तोडताना कसा फक्त काट्यावरच वाऱ झाला

रूढी परंपरा पाळून ही एक जीव उंबऱ्यात ठार झाला
नसते झेंगट नको म्हणून वादविवाद फार झाला

केसाने गळा कापताना मनावर प्रहार झाला
इतका प्रयास कामी आला कि नामवंत सुतार झाला

पिढी दर पिढी त्याच जगण्याचा प्रसार झाला
फोडा आम्हास उतरंडीचाही जयजयकार झाला

घेतो जराशी विश्रांती म्हणून कायमचा गार झाला
बघ उघडून डोळे दुनियेत तुझ्या हाहाकार झाला
--मनिषा
 

राधाकृष्ण


 
------------------
कृष्णाने राधेशी केला एक वादा
अगदी खरा  आणि साधासुधा  

प्रेम आपले   युगानुयुगे  अमर राहील 
हे  जग  माझ्या  आधी तुझे  नाव घेईल 

माझ्या बासरीचे सूर जेंव्हा निघतील 
फुले होऊन तुझ्यावर  बरसतील 

तुझे  मला अखंड  स्मरण राहील 
तूला    मज स्मरताना हे वृंदावन  पाहील 

ह्रदयात माझ्या तुझीच प्रतिमा राहील  
राssधे   राssधे  करताना कृष्णच   राधा होईल 

--मनिषा बांगर -बेळगे 

परी

परी साज साजिरी रूप मंजिरी 
परी अवतरली माझ्या मंदिरी 

निळ्याशार नभातली प्रभा जणू 
की सागरातील अवखळ सरिता तुज म्हणू 

अल्लड चंचला, अवखळ नलिनी तू
खळ खळ निर्झरा ,निर्मळ नंदिनी तू

फुलावरील तू मोहक फुलराणी
तूच माझी काव्या,तूच माझी रातराणी

नयन तुझे जणू निळा निळा डोह
टाळता येत नाही तुझ्याकडे पाहण्याचा मोह

पाऊले तुझी जणू सुवर्ण कमळे
चाफ्यासम कर तुझे भासतात आगळे

घेतेस वेधून सर्वांच्या नजरा
घनदाट केसांची तू ऋतुंभरा

---मनिषा बांगर - बेळगे

अर्धांगिनी

-----अर्धांगिनी ------------
तेजस्विनी रुपसंगिनी
मधुर भाषिणी 
तल्लख प्रलोभिनी 

उज्ज्वल मनोल्हादिनी 
रुदन रागिणी
अंतर्मुखी मनस्विनी

सुस्वरुपिनी नारायणी
मृग नयनी
कठोर दाक्षायणी

श्यामल हंसिनी
दक्ष दासीनि
चतुर मनमोहिनी

विलक्षण विलोभिनी
प्रयास सत्यवचनी
यशस्वी वामंगिनी

रजस्वला मानिनी
नार गर्भधारिणी
जन्मदात्री पुत्र पौत्रानी

अन्नपूर्णा उदरभरीनी
सार्थ गृहस्वामिनी
अभिमानी अर्धांगिनी

--मनिषा बांगर - बेळगे