दिवाळी दसऱ्यास तोरणे लावली
सडा रांगोळीने शोभा आणली
हर्ष त्यास लक्ष्मीच्या पावलांचा
मिरवतो दिमाखात उंबरा घराचा
परंपरेने लेकीस पाठवले सासरी
सून हि आली माप ओलांडून दारी
झेलून भार अंगावर नातवंडांचा
मिरवतो दिमाखात उंबरा घराचा
करी मज्जाव विकण्या जीव असे धन्यात
तुझा मी मूक सवंगडी देईन आजन्म साथ
थबकती पाऊले करी स्वीकार दर्शनाचा
मिरवतो दिमाखात उंबरा घराचा
कटकारस्थाने चाटून गेली
पिढी दरपिढी भांडून गेली
पचवला प्याला विषाचा
मिरवतो दिमाखात उंबरा घराचा
अगणित पिढ्यांचा चालवी वारसा
जन्म मृत्यू ने झिजला जरासा
मज दिसे त्यात अंदाज वीराचा
मिरवतो दिमाखात उंबरा घराचा
------मनिषा बांगर -बेळगे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा