मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३

तर रविवारच्या मेजवानीत मनीषा बेळगे ह्यांचे "खाईन तुपाशी"......हिंदी मध्ये एक गाणे होते आठवते का किशोर कुमारचे "जाते थे जापान...पहुच गये चीन"
हा हा हा...

पत्र लिहिण्याआधी थोडेसे – 

"न लिहिलेले पत्र " या पेजची यशस्वी घोडदौड सुरु आहे. त्यासाठी संचालक ,सहसंचालक आणि समस्त पत्र लेखक वृंद आणि मायबाप वाचक यांचे अभिनंदन …।

रविवारच्या मेजवानी मध्ये सदर लिहिशील का ? असे जेंव्हा व्ही.बी सर यांनी विचारले असता, तसे जोखमीचे काम असूनही मी तत्काळ होकार दिला. "नेकी और पुछ पुछ" पण प्रश्न होता कुठल्या विषयावर लिहावे. तसे मला राजकारणात जास्त रस आहे. पण तरीही वेगळे लिहिण्याचा मानस होता. मग मी पत्रातून रेसिपी लिहिण्याचा विचार बोलून दाखवला. व्ही.बी सरांनी खूप प्रोत्साहित केले. त्यांनी विचारले पत्र कोणाला लिहिणार, मी म्हंटले अर्थात आईला, आई इतकि जवळची मैत्रीण कोणी नाही. सरांनी लगेच समंती दिली. आम्ही काही शीर्षकांवर चर्चा केली शेवटी "खाईन तुपाशी" हे शीर्षक ठरवले आणि पत्र लिखाण सुरु झाले. किती दिवस चालेल, हे आताच सांगता नाही येणार. पण प्रत्येकवेळी पत्र पोस्ट झाल्यानंतर जे समाधान मिळते ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. लाखो धन्यवाद व्ही.बी. सर........

प्रिय आईस,

तुझ्यातल्या संवेदनशीलतेला कोटी कोटी प्रणाम, नेहमीप्रमाणे या हि वर्षी तू सुलोचनाला कामावर ठेवले असशील. दिवाळी आली कि हि येते, बाकीचे दिवस कुठे असते कोण जाणे.कितीतरी वेळा तिला तू चोरी करताना रंगेहात पकडलेय. तरीही तू सर्व विसरून पुन्हा कामाला ठेवतेस. चोरी करणाऱ्याला कोणी चांगले बनण्याची संधी देतं का ? तू मात्र अजब आहेस तू पुन्हा पुन्हा तिला सुधरण्याची नाही तर चोरी करण्याची संधी देतेस. तुझा आपला ठाम विश्वास, ३ मुलींची आई आहे, मुलगा होत नाही म्हणून नवऱ्याने टाकलीय, आईवडील वारलेले , जवळचे असे तिला कोणी नाही,मग आपण थोडा आधार दिला तर कुठे बिघडले. आज तिच्यावर वेळ आलीय, म्हणून ती तशी वागतेय.एक दिवस नक्की सुधारेल.……. मान्य आहे पण पूर्वी ती आपल्याकडे राह्यची, मळ्यात तिला एक खोली पण दिली होती. मुलीही शाळेत जात होत्या. अचानक तिला काय दुर्बुद्धी सुचली. छोट्या मोठ्या चोऱ्या करायला सुरवात केली.एक दिवस तिने तुझ्या नवीन साड्या पळवल्या. आणि त्यांनतर ती मुलीन् सहित अचानक गायब झाली. तू माहिती काढली तर कळले कि तिला एक दूरचा मामा होता. तिकडे गेलीय. आतापर्यंत हा मामा कुठे होता ? त्यांनतर ती बरोबर ६ महिन्यांनी परत आली. माफीचा एकही शब्द तिने उच्चारला नाही . आणि तू तिला पुन्हा कामावर ठेवलीस.….

असो आता तू म्हणशील, तुला तिने बनवलेला स्वयंपाक आवडतो ना . "हो ग आई तिच्या हाताला खूप छान चव आहे". एवढ्या एका गोष्टीसाठी माझा तिच्या विषयीचा विरोध संपून जातो. तिने बनवलेल्या पदार्थाचे नाव काढशील तर, माझे असले नसलेले अवसान गळून पडते. उन्हाळ्यात वाळवण बनवताना तिची तुला फार मदत व्हायची कोहळ्याच्या वड्या , कुरड्या ,पापड , साबुदाण्याचे पापड, ज्वारी बाजरीच्या पापड्या याशिवाय मसाले सुद्धा उत्तम बनवायची अर्थात तूच शिकवले होते. सुलोचनाच्या हातचा माझा आवडता पदार्थ म्हणजे शेंगदाण्याचे लाडू मला आठवते मी सुट्ट्यात गावी येणार म्हंटले कि,मला आवडतात म्हणून, ती हमखास तिळाचे, शेंगदाण्याचे लाडू कुटून बनवायची. दुबईत आल्यावर मी बऱ्याचदा बनवते, पण सुलोचना सारखे नाहीत होत.

अरे हो खाण्यावरून वरून आठवले. तुला मी आज मी एक गंमतीशीर रेसिपी सांगणार आहे. हि रेसिपी माझ्याकडून अपघातानेच घडली. म्हणतात न "करायला गेले गणपती आणि झाला मारुती" तसा काहीसा प्रकार झाला खरा, पण सगळ्यांना आवडून गेली. मग मी माझे गुपित कोणाला सांगितले नाही. फक्त तुला सांगते. हे वाचून आता हसू नकोस गालातल्या गालात.

तर आपण कुठे होतो …. अरे हो रेसिपी ,त्याचे काय झाले तुझ्या नातवाला पार्ले जी आणि गुड डे बिस्कीट आवडतात. बऱ्याचदा बिस्कीट पुडा खोलताना कधी बिस्कीटचे तुकडे होतात. तो तुकडे खात नाही. एकदा असेच डबा भरून तुकडे जमा झाले होते. धड फेकुनही देत येत नव्हते. कोणाला द्यावे तर इथे भिकाऱ्यांचा दुष्काळ, काय करावे सुचत नव्हते, मला आठवले एकदा मी मारी बिस्किटचा केक बनवला होता. तसाच बनवता येईल का म्हणून मी प्रयत्न करत होते. मग काय सर्व बिस्किटांचा व्यवस्थित चुरा करून घेतला. एकदा मिक्सरला लावले. मस्त पावडर तयार झाली. केक मध्ये बिस्किटाची टेस्ट समजायला नको म्हणून तो चुरा साजूक तुपात खरपूस भाजून घेतला. केकसाठी लागणारे साहित्य घेतले. आता या भाजलेल्या चुऱ्या मध्ये लोणी ,आणि क्रीम मिसळण्या आधी, मी बाजूला थोडे मिश्रण करून बघितले नुसताच चिकट लगदा तयार झाला. आता या चिकट लगद्याचा केक बनणे शक्य नव्हते. आता चांगल्या १ किलो चुऱ्याचे काय करावे सुचत नव्हते. मग मनाला म्हंटले लढ मना लढ. बर्फी , पनकेक, पराठे, करंजी झाली तेवढी मेहनत खूप झाली होती त्यामुळे अजून करंजी किवा बर्फी बनवण्या इतका वेळ वाया घालवू नये असे वाटत असताना एकदाचे सुचले सुचलेच बघ " लाडू "!

मग थोडे डेसिकेटेड कोकोनट , काजू ,बदाम ,पिस्ते यांचे तुकडे करून घेतले. थोडी पिठी साखर घेतली. चुऱ्या मध्ये सर्व मिसळले. अजून थोडे तूप टाकले. लाडू वळवायला घेतले. लाडू काही वळत नव्हते. आता पुन्हा डोके दुखी आता तर ड्रायफ्रुट्स टाकल्यामुळे फेकण्याची अजिबात हिम्मत होत नव्हती. मग दुध गरम केले, मिश्रणात गरम दुधाचा हलकासा शिडकावा मारलाऽनि आईईईई मी जिंकले होते. लाडू वळून तयार. केवढा आनंद झाला म्हणून सांगू.

पण अजून एक पायरी बाकी होती. चव कशी झाली असेल? अत्यंत महत्त्वाची परीक्षा अजून बाकी होती. मुले अजून शाळेतून आली नव्हती. कोणाला टेस्ट करायला सांगावे याच विचारात असताना, दारावर बेल वाजली. एक मैत्रीण आली होती. मी तिला काही कळू देत लाडू खाण्यास दिला. तिने आणखी एक मागवून घेतला. तिला आवडला. कशाचे लाडू म्हणून ती विचारून थकली,तरी मी काही सांगितले नाही. तिच्या मुलाकरता डब्यात काही लाडू दिले. एकंदर चव छान झाली होती याचे समाधान मिळाले. आमच्याकडे बिनबोभाट लाडू फस्त झाले. कोणाला सुगावा लागला नाही. संध्याकाळी त्याच मैत्रिणीचा फोन आला, अग कशाचे लाडू बनवलेस सांग तरी नाहीतर मला बनवून दे आमच्या घरी सर्वाना आवडलेत. तेवढ्यात तिच्या मुलाने फोन घेतला म्हंटला काकू गुड डे लाडू छान झालेत. तिच्या मुलाने गुडडे बिस्कीट ची चव ओळखली असावी. माझ्या या करामतीला नाव हि मिळाले "गुड डे लाडू" …

आता म्हंटले चला हि रेसिपी आपल्या नावावर जमा झालीय. कोण आनंद झाला म्हणून सांगू आत्ता तू हि ट्राय कर. नाहीतर मी तिकडे आली कि बनविण.
तूर्तास थांबते
तुझी लाडकी लेक मनिषा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: